Loading..

News and Events

‘जयोस्तुते‌’ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील उलगडले पैलू

नाट्यसंस्कार कला अकादमी निर्मित नाट्यप्रयोगाला रसिकांची पसंती पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची देशभक्ती, त्याग, समर्पण आणि विज्ञाननिष्ठा असे विविध पैलू कलाकारांनी उलगडले ते ‌‘जयोस्तुते‌’ या दोन अंकी नाट्यकृतीतून! नाट्याला संगीत आणि नृत्याची जोड मिळाल्याने ही नाट्यकृती अधिक प्रभावी आणि नेटकी ठरली. पुण्यातील सुप्रसिध्द कलाकार अन्वय बेंद्रे यांच्या बहारदार आवाजात निवेदन ऐकताना प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे रविवारी ‌‘जयोस्तुते‌’ या नाटकाचा शुभारंभाचा पहिला प्रयोग रसिकांच्या उदंड प्रतिसादात भरत नाट्य मंदिरात झाला. 5 ते 75 वर्षे वयोगटातील पुण्यातील 50 कलाकारांचा यात सहभाग होता. नेत्रदिपक प्रकाश योजना, समर्पक असेल नेपथ्य तसेच पड्यावरील दृक-श्राव्य माध्यमातून प्रसंगांची केलेली मांडणी प्रभावी ठरली. खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, माजी नगरसेविका प्रा. माधुरी सहस्रबुद्धे यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदार मेधाताई कुलकर्णी यांच्या हस्ते तिसरी घंटा देऊन प्रयोगाचा शुभारंभ झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बालपण, पुण्यातील शिक्षण, इंग्लंड मधील क्रांतिकारी योजना, पारतंत्र्यात असलेल्या भारतमातेला स्वतंत्र करण्याविषयीची तळमळ, स्वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांविषयी असलेली आत्मियता, सुटकेसाठी समुद्रात मारलेली उडी, अंदमानातून परतल्यावर रत्नागिरी येथील सामाजिक कार्य, सावरकरांची विज्ञाननिष्ठ भूमिका असे विविध पैलू ‌‘जयोस्तुते‌’ या नाट्यकृतीतून रसिकांना नव्याने अनुभवायला मिळाले. दोन-सव्वादोन तास खिळवून ठेवणाऱ्या नाट्य प्रयोगाला रसिकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद हे आणखी एक वैशिष्ट्य! संकल्पना प्रकाश पारखी यांची होती तर लेखन आणि दिग्दर्शन अमोल जाधव यांचे होते. नेपथ्य : पुष्कर देशपांडे, प्रसन्न सोहोनी, नृत्य दिग्दर्शन : सुचित्रा मेढदकर, गीत दिग्दर्शन : पूजा पारखी, प्रकाश योजना : सुधीर फडतरे, पार्श्व संगीत : योगेश सातपुते. " जयोस्तुते " या क्रांतीनाट्याची निर्मिती सूत्रधार ही जबाबदारी प्रतीक पारखी यांनी सांभाळाली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार आजच्या तरुणांना आणि लहान मुलांना समजावेत या उद्देशाने ‌‘जयोस्तुते‌’ या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. नाट्य, नृत्य, संगीत अशा विविध पैलूंनी साकारलेला आविष्कार म्हणजे ‌‘जयोस्तुते‌’. या नाट्यकृतीच्या निर्मिसाठी सात्यकी सावरकर आणि सावरकर कुटुंबियांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
– प्रकाश पारखी

‌‘जयोस्तुते‌’ ही एक अप्रतिम, अद्वितीय, अनोखी आणि संस्मरणीय नाट्यकृती पाहण्याचा योग आला. या नाट्यकृतीद्वारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनपट डोळ्यापुढे उभा राहिला. नाट्यप्रयोगासाठी सुयोग्य-समर्पक कवितांची निवड करण्यात आली. कलाकारांचे गायन आणि नृत्याविष्कारही प्रभावी होता. या नाटकाचे अधिकाधिक प्रयोग व्हावेत यासाठी शुभेच्छा. 

– राजा मोघे, प्रेक्षक

महिन्यांच्या रविवार सत्र नाट्य कार्यशाळेला सुरवात (जुलै,ऑगस्ट,सप्टेंबर महिन्यातील सर्व रविवार)

नाट्य कार्यशाळा: 15 एप्रिल ते 29 एप्रिल
सरिता विद्यालय पर्वती पायथा : 1 मे ते 15 मे , ग.रा. पालकर शाळा कर्वेनगर

19 मे ते 2 जून सुखी विला चिंचवड येथील यशस्वी नाट्य कार्यशाळेनंतर जुलै महिन्यात रविवार सत्र नाट्य कार्यशाळेला सुरुवात झाली .ग.रा. पालकर शाळा कर्वेनगर आणि सुखी विला चिंचवड येथे रविवार सत्र नाट्य कार्यशाळांना उदंड प्रतिसाद मिळाला. जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यातील सर्व रविवारी या कार्यशाळा होणार आहेत सप्टेंबर महिन्यात च्या शेवट याचा समारोप होईल.

33वी दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धा नुकतीच पुणे विभागात पार पडली.

नाट्यक्षेत्रात येणाऱ्यांनी बहुश्रुतता अंगी बाळगावी : प्रभाकर निलेगावकर नाट्यक्षेत्रात येणाऱ्या मुलांनी शरीरयष्टी सुदृढ ठेवावी, ओंकारसाधना करण्याबरोबरच बहुश्रुतता अंगी बाळगावी, असा सल्ला ज्येष्ठ एकपात्री कलाकार प्रभाकर निलेगावकर यांनी दिला. नाट्यछटा हे एकपात्रीचेच मूल रूप आहे, असेही ते म्हणाले. नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे घेण्यात आलेल्या 33व्या दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेची अंतिम फेरी व बक्षीस वितरण समारंभ निवारा सभागृहात आयोजित करण्यात आला होता. पारितोषिक वितरण निलेगावकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. नाट्य क्षेत्रात मुलांकडून काम करून घेताना पालकांचा पाठींबा मिळणे आवश्यक आहे. नाट्यछटा हे कमी वेळात उत्कृष्ट सादरीकण करण्याचे एक माध्यम असल्याचे निलेगावकर म्हणाले. नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी, विश्वस्त संध्या कुलकर्णी, अभिनेता नचिकेत पूर्णपात्रे मंचावर होते. प्रास्ताविक : प्रकाश पारखी यांनी संस्थेच्या वाटचालीची तसेच संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी नाट्यसंस्कारतर्फे घेण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाची सुरुवात पूजा पारखी यांच्या ईशस्तवनाने झाली. सूत्रसंचालन आरती दाते यांनी केले तर आभार सायली पाटील यांनी मानले. प्रसन्न सोहनी यांनी या स्पर्धेचे व्यवस्थापन केले. नाट्छटा स्पर्धेची प्राथमिक फेरी सरिता विद्यालय, महेश विद्यालय, ग. रा. पालकर प्रशाला, दिघी येथील रेड क्लिप हायस्कूल आणि भारत स्काऊट ग्राउंड या विविध केंद्रावर घेण्यात आली. त्यातून 51 स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले. अंतिम फेरीचे परीक्षण पुष्कर देशपांडे, नचिकेत पूर्णपात्रे, अमोल जाधव, पद्मजा माने-मोरे, अश्विनी आरे यांनी केले. बक्षीस समारंभापूर्वी सर्व गटातील प्रथम क्रमांक पटकाविण्याच्या स्पर्धकांनी नाट्यछटा सादर केल्या.

स्पर्धेचा सविस्तर निकाल

शिशु गट : प्रथम नक्ष पटर्वन, द्वितीय हिरण्या सप्रे, उत्तेजनार्थ काशवी माकुडे, ऋषिका बहिरजी.

पहिली व दुसरी : प्रथम गौरांगी केळकर, द्वितीय वेधस प्रभुदेसाई, तृतीय शर्विल कुलकर्णी, उत्तेजनार्थ दर्श बोकील

तिसरी व चौथी : प्रथम शिवांश मोरे, द्वितीय नील देशपांडे, तृतीय गार्गी वैद्य, उत्तेजनार्थ राजवी बामगुडे, अक्षरा जोशी, सन्विता कुलकर्णी.

पाचवी ते सातवी : प्रथम कैवल्य चांदवलय, द्वितीय अन्वय देशमुख, उत्तेजनार्थ वैदेही ठाकूर

आठवी ते दहावी : प्रथम आराध्या लोंढे, द्वितीय सावनी दात्ये.

खुला गट : प्रथम हर्षदा कुलकर्णी, उत्तेजनार्थ सचिन काळे.

33वी दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धा नुकतीचपिंपरी चिंचवड विभागात पार पडली.

पिंपरी चिंचवड विभाग यावर्षी प्राथमिक फेरी सिटी प्राईड शाळेच्या मोशी, रावेत आणि निगडी शाखांमध्ये, अविष्कार बाल भवन चिंचवड, ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी येथे उत्साहात पार पडली. सुमारे पाचशेच्या वर स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. त्यानंतर या स्पर्धेची अंतिम फेरी 25 ऑगस्ट रोजी ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी येथे झाली. बक्षीस समारंभ 25 ऑगस्ट रोजी ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी येथील वढोकर सभागृहात संपन्न झाला.